निबंध कसा असावा ? How essays should be?

          निबंध लिहिणे ही एक कला आहे. एखाद्या विषयावर सुसंगतपणे आणि मुद्देसुद पणे लिहिलेले विचार म्हणजे निबंध. भाषेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये निबंधचा प्रश्न हा अतिशय महत्त्वाचा असतो. त्यामुळे तुम्ही निबंधाचा प्रश्न सर्यप्रथम सोडावला काय आणि सर्वात शेवटी सोडवला काय त्या निबंधलेखनावरुन तुमची बुद्धिमत्ता, कल्पनाशक्ती व तुमच्या प्रतिभा गुणांची पारख ठरते.           निबंधाचा स्तर अधिक चांगला असेल तर गणितासारखे पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. यासाठी निबंध लिहिताना त्या विषयाच्या अनुशंगाने मुद्य्यांचा वापर करावा. आपल्या विचारांची विविधता आपल्या दैनंदिन वचनावर आणि चिंतनावर अवलंबवून असते. यासाठी ज्याला उत्तम निबंध लिहायचा आहे त्याने मिळेल ते पुस्तक त्यावेळी वाचले पाहिजे.           निबंध हे वारंवार वाचा त्याचबरोबर आपण जे पाहतो, ऐकतो, वाचतो, त्याची नोंद करून ठेवा. कारण अशी केलेली नोंद आपण निबंधात कशी वापरू शकतो याचे आकलन या पुस्तकातील निबंध वाचताना विद्यार्थ्यांना आपोआपच होईल.         ...

झाडे नसती तर - Zade Nasti Tar

        झाडे नसती तर.. छे! कल्पनाच करवत नाही. आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण आणि कण आपण अनुभवतो तो झाडांमुळेच आणि म्हणूनच त्याच्याबाबत ही कल्पनासुद्धा कृतघ्नपणाची वाटते.

        झाडे ही निसर्गातील सर्वात महत्त्वाचा घटक आहेत. झाडांमुळे पर्यावरणाचे संतुलन राहते निसर्गातील ऋतुचक्र हे केवळ झाडांवरच अवलंबून आहे. पर्जन्यवृष्टीचा महत्त्वाचा भाग म्हणजेच ही झाडे आहेत. झाडांमुळे वातावरणात थंडावा निमार्ण होतो कडुलिंबाच्या झाडाखाली सर्वसामान्य तापमानापेक्षा ५° से. तापमान कमी असते.

        झाडांचे महत्त्व भारतीय संस्कृतीने हजारो वर्षापासूनच जाणले आहे. म्हणूनच भारतीय समाजात निसर्गपूजा हा महत्त्वाचा भाग मानला जातो. आपल्या आयुष्याचा प्रत्येक श्वास हा झाडांच्या योगदानामुळेच आहे हे आपल्या पूर्वजानींही मान्य केले आहे. म्हणूनच तुळशीचे, वडाचे, पिंपळाचे पूजन ही त्यांच्याबद्दल व्यक्त केलेली कृतज्ञताच आहे. जंगलतोड करणे हा आता कायद्यानेही गुन्हा आहे. म्हणजेच संस्कृतीपासून कायद्यापर्यंत मानवाच्या प्रगल्भतेतही झाडांची त्याला साथ आहे.

        आयुर्वेद, वनौषधी, पुष्पौषधी या सर्व प्रकारच्या उपचारात झाडांचे योगदान आहे. साल, कदंब, पिंपळ, बेल, हिरडा, बेहडा, कडुलिंब, उंबर, आवळा, हळद, केशर इ. वृक्षांपासून मिळणाऱ्या उत्पादनांचा समावेश आपल्या औषधात आणि सौंदर्य प्रसाधनात केला जातो. याशिवाय आपल्याला जगण्यासाठी आवश्यक असणारी फळे, भाजीपाला, मसाल्याचे पदार्थ इ. पदार्थ झाडांपासूनच मिळतात. त्याचप्रमाणे लाकूड, फळबिया, तेलबिया ही झाडांपासून मिळतात. देवदार, सागवान, आंबा, साल, चंदन, खैर, बांबू यांचा उपयोग लाकडी वस्तू व कागद बनविण्यासाठी होतो.

        झाडे निसर्गातील सौंदर्य वाढवतात किंबहुना तो नैसर्गिक सौंदर्याचा सर्वोत्तम नमुना आहे. गुलाब, ट्युलिप, मोगरा, डेलिया, बगैंडी, ग्लॉडीया, कमळ, पारीजात... अलौकिक सौंदर्याचे कितीतरी अविष्कार आहेत. किती सुंदर नि आल्हाददायक ! डोळे असल्याचे खरे समाधान ही झाडे पाहतानाच मिळते. झाडांसोबत अनेक सुंदर पक्षी आणि प्राणी यांचे आयुष्यही झाडांवरच अवलंबून आहे. झाडे नसती तर या सुंदर जीवांचे अस्तित्वही लोपले असते याशिवाय कापूस, ताग, रेशीम इ. झाडांपासून मिळणारी उत्पादने ज्यांचा उपयोग मनुष्याला कपडे आणि इतर वस्तू बनविण्यासाठी होतो.

        झाडे आपले खरे सोबती आहेत. जन्मापासून अखेरपर्यंत प्रत्येक क्षणाला कोणत्या ना कोणत्या रूपाने ती आपल्याला साथ देत असतात. कधी ऑक्सिजनच्या, कधी अन्नाच्या, कधी औषधांच्या तर कधी कपड्यांच्या, कधी निवाऱ्याच्या तर कधी अत्तरे, शोभेच्या वस्तू इ. च्या रूपाने ती आपले अस्तित्व आपल्याबरोबर राखतात आणि आपल्या मुलभूत आणि दुय्यम गरजा भागवून ती आपल्या अस्तित्वालाही अधिक जीवनाभिमुख बनवतात म्हणूनच जगातल्या कोणत्याही गुरूकडून, शिक्षकांकडून शिकता येत नाही ते झाडे आपल्याला शिकवतात आणि सर्वस्वाचे दान करतात म्हणूनच झाडांसारखा धर्मात्मा नाही. झाडे नसती तर कोणत्याही सुखसोयी नसत्या. कोणत्याही सुधारणा नसत्या. आपल्याला संस्कृती लाभली नसती आणि आपले अस्तित्वही नसते. कारण झाडे ही निसर्गाच्या प्रत्येक घटकाच्या जीवनाचा मुलभूत आधार आहे.

धन्यवाद, तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा.

टिप्पण्या