'युद्धस्य कथा रम्या' असे म्हणतात, ते खरेच ! पण कोणाला? ज्याचे जवळचे असे कोणी लढाईवर गेलेले असतील त्यालाच ? माझ्या दु:खावरची खपली अगदी ताजी आहे. कारगील युद्धात माझ्या पतीला वीरगती प्राप्त झाली.
उत्तर सीमेवर कारगिल क्षेत्रात शत्रूने छुपे युद्ध सुरू केले. घनघोर लढाई झाली. त्या युद्धात भारतीय सैन्याची सरशी झाली. सगळीकडे विजयोत्सव चालू असताना माझ्या व माझ्या छोट्या बाळाच्या जीवनात मात्र दाट अंधार पसरला कारण त्या लढाईत माझ्या बाळाच्या बाबांना वीरमरण लाभले होते. मी अभागिनी मात्र निराधार झाले. जरी वीरमरण आले तरी मला आज विधवेचे जिणे जगावे लागणार आहे. आपल्याकडे विधवेला समाजामध्ये काय मान असतो हे आपल्याला माहीत आहे. मग ती स्त्री सैनिकाची बायको असो अगर पोलिसाची बायको ती अखेर विधवाच तेव्हा लोक का विचार करत नाही. एखाद्याचा घरातील व्यक्तीचा मृत्यू युद्धात झाल्यानंतर जो काय मान मिळतो तो एकच दिवस तो मान असतो वीरपत्नी, वीरमाता पण मला माझा अभिमान आहे की माझा पती शत्रूला नामोहरण करता करता गेला. त्याला वीरमरण आले.
अनाथ अशी मी माझ्या मामा-मामीकडे वाढले. मामा-मामींनी आपल्या ऐपतीप्रमाणे माझे पालनपोषण केले. माझे लाड कधी कोणी पुरविले नाहीत. पण दुःस्वासही माझ्या वाट्याला कधी आला नाही. एस्. एस्.सी. पास होईपर्यंतच माझे लग्न जमले. पुढे शिकण्याची इच्छा असूनही शिकता आले नाही. मामा-मामींना सांगू शकत नव्हते की मला शिक्षण पूर्ण करायचे आहे. त्यांच्या डोईवरचा भार त्यांना कमी करायचा होता. मामांनी लग्न जमवले तेही लष्करातील सैनिकांशी घाईगर्दीत लग्न पार पडले. कारण माझे पती लष्करात होते. लष्कराचे बोलावणे आले की त्यांना तत्काळ रणभूमीवर जावे लागणार होते.
एक वर्षाचा सुखी संसार झाला आणि अचानक हे युद्ध सुरू झाले. माझ्या पतीला युद्धावर जाण्याचा हुकूम आला आणि त्यांनी माझा निरोप घेतला. दुर्देवाने ती भेट शेवटचीच ठरली बाबांनी बाळाला पाहिले नाही. बाळानेही आपल्या पित्याला पाहिले नाही.
छोट्याशा सांसारिक जीवनात पुन्हा एकदा मी निराधार झाले. माझ्यासारखे माझ्या बाळाला निराधार करायचे नाही असे मी ठरविले. एक विलक्षण आत्मिक बळ माझ्या मनात निर्माण झाले. मी माझे अश्रू पुसले. कारण मी एक वीरपत्नी होते. माझ्या पतीला वीरगती मिळाली होती. आता मला वीरमाता व्हायचे आहे. शासनाने मला नोकरी व राहण्यासाठी जागा दिली आहे. बाळाला पाळणाघरात ठेवून मी कामावर जाऊ लागले. प्रजासत्ताकदिनी राष्ट्रपतींच्या हस्ते मी माझ्या पतीचे मरणोत्तर वीरपदक स्वीकारले. आज एकाकी जीवनात साऱ्या शौर्यगाथाच मला सोबत करतात. माझा निर्धार मात्र अधिक बळकट झाला आहे. म्हणूनच सर्व दु:ख बाजूला सारून ठरविले की आपण आपल्या बाळाला शूर सैनिक बनवावे.
माझ्या पतीची राहिलेली स्वप्ने साकार करावीत. आपल्या बाळाला आपल्या देशाच्या संरक्षणासाठी पाठवावे.
धन्यवाद, तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये
जरूर कळवा.
टिप्पण्या