मानवाने आपल्या बुद्धीच्या व कल्पनाशक्तीच्या सामर्थ्यावर अशक्य गोष्टी शक्य करून दाखविल्या हजारोवर्षापूर्वीचा रानटी माणूस आज सभ्य नि सुसंस्कृत बनला आहे. मानवाच्या या भरमसाठ प्रगतीचे श्रेय विज्ञानालाच द्यावे लागेल. विज्ञानाची पहाट झाली नि मानवाच्या जीवनातील अज्ञान-अंधकार निवळत गेला.
विज्ञानाने जगाला जे दिलं त्याकडे दृष्टीक्षेप टाकला की, काही न विसरले जाणारे प्रसंग आठवतात. दुसऱ्या महायुद्धात विज्ञानजनित शास्त्रज्ञांनी जो अमानुष नरसंहार केला तो विसरता येईल का? जपानची दोन मोठी शहरं हिरोशिमा व नागासाकी भयंकर बॉम्बवर्षावाल जळून खाक झाली. तिथलं जीवनच जणू होरपळून निघालं सजीव, निर्जिव सारे धुळीत मिळाले. आगीचा हा भयंकर भस्मासूर विज्ञानाची देणगी होती ना? अशा या संहारक शक्तीला वरदान कसे मानावे?
विज्ञानामुळे राष्ट्रा-राष्ट्रात सत्ता स्पर्धा सुरू झाली. माणसाचे जीवन कवडीमोलाचे वाटू लागले. यंत्राच्या प्रचंड शक्तीपुढे मानव छोटा वाटू गला. वेगवेगळ्या विस्फोटांमुळे, रासायनिक प्रक्रियांमुळे, वाहनांच्या वर्दळीमुळे हवेत वेगवेगळी प्रदूषणे उद्भवत आहेत. विज्ञानाची ही झेप अशीच उंचावत गेली तर वातावरणात शुद्धता शोधून सापडणार नाही. हे पाहिले की वाटतं विज्ञान म्हणजे शाप होय.
विज्ञानामुळे प्लॅस्टिक ची उत्पत्ती झाली व प्लॅस्टिकच्या अतिवापरामुळे भूमी प्रदूषण झाले व प्लॅस्टिकचा नायनाट करणे अजूनही शक्य झालेले नाही. प्लॅस्टिकच्या अतिवापरामुळे कचऱ्याचे प्रमाण वाढले व ठिकठिकाणी कचऱ्यामुळे घाण पसरली व वातावरण प्रदूषित झाले आहे.
आता आपण नाण्याची दुसरी बाजू पाहू या. विज्ञानाचा तिसरा डोळा लाभण्यापूर्वी माणूस हा अगदीच मागासलेला होता. लहानसहान सुखासाठी त्याला जीवाचं रान करावे लागत असे. आता सर्व गोष्टी कशा सुरळीत होताना दिसतात. उकाडा होतोय-फॅन सुरू करा. अंधार वाटतो विजेचा लख्ख प्रकाश पसरवा. घरात हिटर, फ्रीज, कुलर अशा कितीतरी गोष्टी सुख देणाऱ्या आहेत. मनोरंजनासाठी रेडिओ, टि.व्ही. टेपरेकॉर्डर सिनेमाचं आकर्षण नाही असा माणूस विरळच. जगातील देशादेशातील अंतर विज्ञानाने कमी केले. मोटार, रेल्वे, हवाई जहाज, हे तुमच्या सेवेला सज्ज आहेत. फक्त बसून रहायचे. वेळेवर पोहोचणारच. शेती उत्पादन, उद्योग लहान मोठे प्रकल्प ही सर्व विज्ञानाची किमया आहे ना? चंद्र मंगळ यांच्यावर उतरण्यात माणसाला लाभलेले यश विज्ञानाचेच वरदान नाही का? मग अशा जीवनाला सर्वार्थाने संपन्न, समृद्ध करणाऱ्या विज्ञानाला वरदानच म्हणावे लागेल.
विज्ञानाने खूप प्रगती केली आहे. विज्ञानामुळे दळणवळण, लोकांचे एकमेकांशी संपर्क व टेलिफोन या गोष्टींची प्रगती झाली. आता वरील दोन्ही विचारांचा सातत्याने विचार केला तर असे दिसून येते की, दोन्ही मते आपापल्या जागी खरी आहेत. पण विज्ञानाने होणारा जो संहार आहे. त्याला खरे पाहिले तर मानवच जबाबदार आहे. कारण हातातल्या आगकाडीने दिवा पेटवायचा का घर पेटवायचं हे मानवाच्याच हाती आहे. विज्ञानाचा दुरूपयोग केल्यास तो शाप वाटतो मात्र सदुपयोग केल्यास विज्ञान वरदान आहे असेच म्हणावे लागते.
धन्यवाद, तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये
जरूर कळवा.
टिप्पण्या