निबंध कसा असावा ? How essays should be?

          निबंध लिहिणे ही एक कला आहे. एखाद्या विषयावर सुसंगतपणे आणि मुद्देसुद पणे लिहिलेले विचार म्हणजे निबंध. भाषेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये निबंधचा प्रश्न हा अतिशय महत्त्वाचा असतो. त्यामुळे तुम्ही निबंधाचा प्रश्न सर्यप्रथम सोडावला काय आणि सर्वात शेवटी सोडवला काय त्या निबंधलेखनावरुन तुमची बुद्धिमत्ता, कल्पनाशक्ती व तुमच्या प्रतिभा गुणांची पारख ठरते.           निबंधाचा स्तर अधिक चांगला असेल तर गणितासारखे पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. यासाठी निबंध लिहिताना त्या विषयाच्या अनुशंगाने मुद्य्यांचा वापर करावा. आपल्या विचारांची विविधता आपल्या दैनंदिन वचनावर आणि चिंतनावर अवलंबवून असते. यासाठी ज्याला उत्तम निबंध लिहायचा आहे त्याने मिळेल ते पुस्तक त्यावेळी वाचले पाहिजे.           निबंध हे वारंवार वाचा त्याचबरोबर आपण जे पाहतो, ऐकतो, वाचतो, त्याची नोंद करून ठेवा. कारण अशी केलेली नोंद आपण निबंधात कशी वापरू शकतो याचे आकलन या पुस्तकातील निबंध वाचताना विद्यार्थ्यांना आपोआपच होईल.         ...

मला लॉटरी लागली तर - Mala Lottery Lagli Tar

        खरं तर लॉटरी लागून मिळणारा पैसा काही कष्टाचा नाही. हा सर्व खेळ दैवाचाच. एका भाजी विकणाऱ्या माणसाला तीन लाखाची लॉटरी लागल्याचे माझ्या ऐकण्यात आहे. काय गंमत आहे बघा. कालपर्यंत दोन आणि चार रूपये दराने भाजीची जुडी विकणारा आज लखपती झाला. काय बरं केलं असेल त्याने एवढ्या गलेलठ्ठ रकमेचं? त्याने काहीही केलं तरी मी काय करणार हे जाणून घ्यायला तुम्ही सारे उत्सुक असाल, तर सांगतो.

        मला माझ्या जन्मगावाचे खूप आकर्षण आहे. या गावात अनेक गोष्टींचा अभाव आहे. त्यापैकी शिक्षण, आरोग्य व रस्ते या तीन गोष्टी मुख्य आहेत. सातवीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर माध्यमिक शाळेच्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना चार मैल पायी चालत जावून शिक्षण घ्यावे लागते. हे त्रासाचं व खर्चाचं देखील आहे. तेव्हा जर मला लॉटरी लागली तर त्यातील काही रक्कम माध्यमिक शाळा उघडण्यासाठी मी खर्च करणार आहे. तर त्यातूनच माझं कॉलेज उभारण्याचही ध्येय आहे. माझी अशी इच्छा आहे की, शिक्षणाची ज्योत घराघरांतून तेवल्याशिवाय अज्ञानाचा अंधार दूर होणार नाही. 'दुरितांचे तिमिर जावो' ही ज्ञानेश्वरांची इच्छा ज्ञानप्रसारानेच सिद्धीला जाणार आहे. घराघरांतून शिक्षण घेवून तयार झालेली मुले ही आपापल्या जबाबदाऱ्या पेलण्यास समर्थ ठरतील त्यातूनच आदर्श नागरिक निर्माण होतील.

        मला लागलेल्या लॉटरीतल्या पैशांनी मी गावातील रस्त्यांची सुधारणा करवून घेणार आहे, कारण रस्ते सुधारले तर दळणवळण, वाहतूक व गावाचे व्यवहार सुधारतील व गावे विकासाच्या मार्गावर पदार्पण करेल. गावातील रस्ते सुधारले तर गाव सुधारेल. गावाला चालना मिळेल. गावातील लोक आरामात आपली कामे पार पाडतील तसेच गावाचा संपर्क चांगला होईल व गावातील लोक एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी आरामात जातील.

        माझी तिसरी योजनाही याच गावासाठी आहे. या गावात दवाखान्याची सोय नाही. लहानसहान आजारांच्या उपचारासाठी शहराकडे धाव घ्यावी लागते. सर्व सामान्य व्यक्ति, शहरांतल्या डॉक्टरांपर्यंत पोहचू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या घरात आरोग्य नांदत नाही. हिवताप, कॉलरा इ. रोगांना गावकरी बळी पडलेले मी प्रत्यक्षात पाहिले आहे. विज्ञानाने रोगराईवर शोधून काढलेल्या विविध उपचारांचा किंवा औषधांचा या जनतेला लाभ मिळू नये ही खेदाचीच गोष्ट म्हणून मी ठाम निश्चय केला आहे की, लॉटरीच्या रकमेतून काही रक्कम खर्च करून
गावात प्रथमोपचार केंद्र उभारणार. तेथे निदान प्राथमिक स्वरूपाची सोय तरी उपलब्ध करून देता येतील. विनाकरण अंधश्रद्धेला बळी पडणार नाही. शिवाय चुकीचे ग्रामीण औषधोपचार थांबतील रोगी विनाकारण दगावणार नाही. याचेच रूपांतर कालांतराने मोठ्या दवाखान्यात करणे सोपे जाईल.

        त्याशिवाय गावातील लोकांसाठी एक सार्वजनिक व आधुनिक स्वरूपाची विहीर बांधून घेईन. कारण पाणी दूषित असेल तर रोगांचा प्रादुर्भाव होतो. ग्रामीण जनतेच्या मदतीने गावातील साफसफाई व बंद गटाराची योजना कार्यान्वित करण्यासाठी ग्रामपंचायतीला उरलेली रक्कम देणगी म्हणून देईन. माझ्या लॉटरीच्या रकमेतून एक गाव जरी आदर्श गाव म्हणून नावारूपाला आला तरी माझे पैसे सार्थकी लागले असे मी समजेन, आणि याचसाठी मी लॉटरी लागण्याची वाट बघत आहे.

धन्यवाद, तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा.

टिप्पण्या