आपला देश हा कृषिप्रधान देश आहे हे फक्त बोलण्यास आणि ऐकण्यासच छान वाटते. अहो, आज मी एक अल्पभूधारक शेतकरी आहे. मी या भूमीचा पूत्र आहे.' जय जवान जय किसान' चा नारा लावून जवान आणि किसान यांचे महत्त्व सारखेच आहे असे आपण सर्वजण मान्य करतो. कारण भारताच्या संरक्षणाची जबाबदारी सैनिकांवर असते; पण पोटाचे म्हणजे अप्रत्यक्षरित्या मानवी जीवनाचे संरक्षण आम्ही शेतकरी करतो. भारत देश हा जरी खेड्यांचा देश असला तरी येथील शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. शेतीवर सर्वांचेच जीवन अवलंबून आहे आणि शेती हा व्यवसाय आम्ही करत असून सुद्धा आम्हांला अजूनही आमच्या कामाची किंमत मिळत नाही.
कसेल त्याची जमीन असा कायदा झाला. याचा हेतू हा की, शेतात राबणारा शेतकरी जमिनीचा खऱ्या अर्थाने मालक व्हावा. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली, सावकाराकडून होणारी पिळवणूक बंद करण्यात आली, या साऱ्या गोष्टींचा गाजावाजा भरपूर झाला. पण सामान्य शेतकऱ्यांपर्यंत या साऱ्या योजना खरोखरीच पोचल्या आहेत का? याची कुणी कधी खात्री करून घेतली आहे का? यामध्ये एकच होते ते म्हणजे श्रीमंत शेतकरी आणखी श्रीमंत होतो आणि गरीब शेतकरी तसाच गरिबीत राहतो.
दारिद्रय हे तर आमच्या पाचवीलाच पूजले आहे. ज्याप्रमाणे मूल जन्माला आल्यावर त्याला जातीचेच लेबल चिकटवले जाते, तसेच शेतकऱ्याकडे जन्माला आलेल्या मुलगा जन्मल्याबरोबर बापाचे कर्ज मुलगा फेडेल असे म्हणून जन्मतःच ऋणात अडकवला जातो. काही खेडेगावामध्ये तर सधन शेतकऱ्यांचा एक नवा वर्ग निर्माण झाला आहे. सारे फायदे हा वर्ग गिळंकृत करतो आणि हेच लोक वेगवेगळ्या नावाखाली सरकारी सोयीसुविधा मिळवतात. मानसन्मान पटकावतात आणि गरीब शेतकऱ्यावर अन्याय करतात. त्यामुळे धनिक शेतकरी हा अधिकच श्रीमंत होतो आणि गरीबशे तकरी हा अधिकच गरीब होतो. त्याच्यात त्याने उत्पन्न काढलेल्या वस्तूंना बाजारपेठेमध्ये योग्य किंमत मिळत नाही. ओला दुष्काळ, यासारख्या अनेक गोष्टींना त्याला तोंड द्यावे लागते. अशावेळी तो कशाचाही विचार न करता कर्ज जास्त झाल्यामुळे वैतागून काही वेळेस तो आत्महत्यासुद्धा करतो.
यावरून खरोखरच आज आपला देश कृषीप्रधान आहे असे तुम्हाला वाटते का ? जर कृषीप्रधान देश असेल तर सामान्य शेतकऱ्याची परिस्थिती अशी का? म्हणून मी एक शेतकरी अवाहन करतो की, आम्ही नक्की काय करावे? आणि सरकारने नक्की काय करून शेतकऱ्याला सुधारले पाहिजे. मित्रहो, यासाठी आपणच जनता जनार्दन यांनी काहीतरी केले पाहिजे.
धन्यवाद, तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये
जरूर कळवा.
टिप्पण्या