निबंध कसा असावा ? How essays should be?

          निबंध लिहिणे ही एक कला आहे. एखाद्या विषयावर सुसंगतपणे आणि मुद्देसुद पणे लिहिलेले विचार म्हणजे निबंध. भाषेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये निबंधचा प्रश्न हा अतिशय महत्त्वाचा असतो. त्यामुळे तुम्ही निबंधाचा प्रश्न सर्यप्रथम सोडावला काय आणि सर्वात शेवटी सोडवला काय त्या निबंधलेखनावरुन तुमची बुद्धिमत्ता, कल्पनाशक्ती व तुमच्या प्रतिभा गुणांची पारख ठरते.           निबंधाचा स्तर अधिक चांगला असेल तर गणितासारखे पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. यासाठी निबंध लिहिताना त्या विषयाच्या अनुशंगाने मुद्य्यांचा वापर करावा. आपल्या विचारांची विविधता आपल्या दैनंदिन वचनावर आणि चिंतनावर अवलंबवून असते. यासाठी ज्याला उत्तम निबंध लिहायचा आहे त्याने मिळेल ते पुस्तक त्यावेळी वाचले पाहिजे.           निबंध हे वारंवार वाचा त्याचबरोबर आपण जे पाहतो, ऐकतो, वाचतो, त्याची नोंद करून ठेवा. कारण अशी केलेली नोंद आपण निबंधात कशी वापरू शकतो याचे आकलन या पुस्तकातील निबंध वाचताना विद्यार्थ्यांना आपोआपच होईल.         ...

हुंडा एक घातक प्रथा - Hunda ek Ghatak Pratha

        लग्नात हुंडा आणला नाही म्हणून सुनेला जाळले, हुंड्याची रक्कम पूर्णपणे दिली नाही म्हणून नवविवाहितेचा छळ, हुंडा दिला नाही म्हणून सासू व नवऱ्याच्या छळामुळे नवविवाहितेची आत्महत्या अशा एक ना दोन अनेक बातम्या वर्तमानपत्रातून वाचावयास मिळतात. खरंच आपण प्रगत अशा २१ व्या शतकाकडे चाललो आहोत की पुन्हा ५ व्या शतकाकडे चाललो आहोत याचा प्रश्न पडतो. आज समाजात केवळ हुंडा या अमानुष प्रथेमुळे स्त्रियांचा छळ होतो आणि नाहक बळी जात आहेत.

"हाय अबला तेरी यही कहानी 
आँचलमें दूध और आँखो में पानी"

        पण असे का? पूर्वी मुलगी लहान असतानाच विवाह होत असे. सासरचे कुटुंब फार मोठे अशावेळी निदान आपल्या मुलीची नीट व्यवस्था व्हावी म्हणून गाय किंवा शेतीचा तुकडा भेट दिला जात असे ही भेट देण्याची सक्ती नसे. त्याच भेटीचे रूपांतर आता हुड्यांत झाले आहे. केवळ अशिक्षित अडाणी समाजात हुंडा घेतला जातो असे नाही पण सुशिक्षित वर्गातही हुंडा दिला जातो. तो उघडउघड दिला जात नसला तरी मुलाचे किंवा मुलीचे लग्न थाटात व्हावे हा आईवडिलांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असतो. एकतर आपल्या घरातील जिव्हाळ्याची सजीव अशी मुलगी दुसऱ्याला द्यायची आणि त्यावर हुंडा. माहेरच्या अंगणातले दाणे टिपणाऱ्या चिमण्या ! बिचाऱ्या भुर्रकन सासरी उडून जातात. भावी सुखाचे कुतुबमिनार उभारलेले असतात पण हे बिचारे वाळूचे मिनार ठरतात. हुंड्यासारख्या एका दुर्देवाच्या अजस्त्र लाटे ने ते उद्ध्वस्त होऊन धुळीला मिळतात.

        हल्ली हुंड्याची रक्कमदेखील वराच्या शिक्षणानुसार व पदवीनुसार अजगरासारखी फुगू लागली आहे. या वरदक्षिणेचे अक्राळविक्राळ स्वरूप झाले आहे. हुंडा म्हणून काय मागतात ? हजारो, लाखो रूपये, पंचवीस पन्नास ग्रॅमपासून दोनशे, पाचशे हजार ग्रॅमपर्यंत सोन्याचे दागदागिने उंची वस्त्रे ! कुणी स्कूटर, मोटर सायकल मागतात. काय म्हणतात माहीत आहे? आम्हाला हुंडा नको, होंडा (हिरो होंडा) हवी. काहींना ब्लॉक खरेदी करण्यासाठी पैसे हवेत, तर कुणाला परदेशी शिक्षणासाठी जाण्या-येण्याचा खर्च हवा. विवाहाला देखील बाजारी रूप आले आहे. हुंडा, मानपान, थाटात लग्न हा खर्च किती वाढतो ? शिवाय सभागृह सजावट, विद्युत रोषणाई याचा खर्च लाखो रूपयात केला जातो आणि हे सर्व केले नाही तर सासरच्या लोकांचे टोमणे-छळ-मारझोड, जाळणे नाहीतर माहेरी हाकलून देणे. मुलीच्या बापाला चरकात पिळण्याचा हा भयंकर प्रकार आहे.

        आजच्या भारतातील कायद्यानुसार हुंडा घेणे हा गुन्हा आहे तसेच हुंडा देणे हा ही गुन्हा आहे. तरीही लोक हुंडा देतात आणि घेतात. वर्षानुवर्षे त्याविरुद्ध संघर्ष चालू आहे. या विषयांवर मराठीत कादंबऱ्या, नाटके प्रसिद्ध झाली आहेत. श्री. भा. वि उर्फ मामा वरेकर यांचे हाच मुलाचा बाप हे नाटक जयंत दळवी लिखित पर्याय नाटक वलेक चालली सासरला' हा चित्रपट यांनीही हा विषय प्रभावीपणे मांडला आहे. नाटक, सिनेमा काढून जागृती थोडीफार होईल, कायद्याने थोडीफार भीती निर्माण होईल खरी आंतरिक सुधारणा होणार नाही त्यासाठी विवाहइच्छुक तरूण तरूणींमध्ये या प्रश्नाबाबत स्त्री जातीवरील अन्यायाची व माणसांच्या अमानुषपणांची जाणीव झाली पाहिजे. समुद्रात हिमनग पाण्याच्या जेवढा वर दिसतो त्याच्या दहापट पाण्यात असतो. हुंड्यासारख्या प्रश्नाचे वरवर दिसणारे स्वरूप सहज सुटणारे व छोटे असले तरी त्याची व्याप्ती पृष्ठभागाखाली फार मोठी आहे म्हणूनच कित्येक नवतरूणींच्या संसाराच्या नौका त्यावर आपटून फुटतात. म्हणूनच आजच्या सबलेला वाटते की खोट्या सुशिक्षितपणाची ही जन्मजात कवचकुंडले दूर फेकून द्यावीत. या अफाट जगातल्या एका असंख्य माणसातलं एक माणूस म्हणून जगावं आणि जो पेला ओठाला लागेल त्यातल्या पेयाचे घुटके हसतमुखाने घ्यावेत.

धन्यवाद, तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा.

टिप्पण्या