इंग्रजांनी आमच्या मातृभूमीवर आक्रमण केले. आमच्याच देशात येऊन आम्हाला गुलामगिरी सोसायला लावली. हा विचार मला अस्वस्थ करीत होता. संपूर्ण देश देशप्रेमाने व्यापलेला, सत्याग्रह चळवळी, मोर्चे यांना नुसता ऊत आला होता. बाँब, पिस्तुले, लेखणी, चरखा व झाडू असली नानाविध आयुधे सामान्यांच्या हातात मिरविली जात होती. प्रत्येकाच्या पुढे एकच ध्येय होतं नि ते म्हणजे स्वातंत्र्य त्यासाठी प्राण पणाला लावून घरादारावर तुळशीपत्र ठेवले तेव्हा नाना पाटलांच्या माणसांनी नुसत्या सातारा जिल्ह्यातच नव्हे तर अवघ्या देशात धुमाकुळ सुरू केला. सरकारला सळो की पळो करून सोडले होते. राज्यकारभार करणे अवघड झाले होते. नाना पाटलांनी तेव्हा तासगावच्या सरकारी कचेरीवर तिरंगा ध्वज उभारला. अनुयायांनी त्यांची अनुकरणे केली मीही त्यात सामील होतो. अजुनही ते मंतरलेले दिवस आठवले तरी रक्त सळसळते.
खेड्यापाड्यांतल्या गरीब, निरपराध, लोकांसाठी प्रतिसरकार निर्माण केले होते. इंग्रज लोकांना धाक बसावा म्हणून त्या सरकारने स्वत:ची न्यायालये निर्माण केली होती. भूमिगतांचा ठावठिकाणा सरकारला कळवणारे स्वार्थी, भेकड यांना पत्र्या मारण्याचे काम सुरू केले होते. गुंडांना आणि खबऱ्यांना पकडून प्रतिसरकारचे अधिकारी त्यांचे तळपाय सडकून काढीत होते. अशाच कोणा खबऱ्याने आमचा कट फोडला होता नि आम्हांला पकडण्यात आले. तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. आमचा गुन्हा काय होता.
नाचविता ध्वज तुझा, गुंतले शृंखलेत हात,
तुझ्या यशाचे पोवाडे गाता, गळ्यात येतात।
चरणांचे तव पूजन केले म्हणून गुन्हेगार,
देता जीवन अर्ध्य तुला ठरलो वेडेपीर।
हे मातृभूमी, खरंच आम्ही गुन्हेगार होतो का? तरीही आम्हाला त्याची तमा नव्हती मी व माझे सहकारी निखान्यावरून चालत होतो, देशासाठी असिघारा व्रत आचरत होतो. जेवढी शिक्षा होईल तेवढे बेहोष होऊन ध्येयपथावरती अविश्रांत, मागे वळून न बघता धावत होतो.
एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार।
अनेकांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. पण मर्त्य मानवाने मृत्यूची तमा बाळगण्याचे कारण नव्हते. मरायचे तर देशासाठी ही प्रतिज्ञा, निर्धार होता. आज कारागृहात बंद असलो तरी उदया स्वातंत्र्याची पहाट पहायला मिळणारच असा विश्वास होता.
रात्रीच्या गर्भात असे उदयाचा उष:काल
अनेक क्रांतीकारकांच्या प्रेतांना अग्नी दिला जात होता, तरीही कोणी डगमगत नव्हता.
सरणावरती आज आमुची पेटताच प्रेते
उठतील त्या ज्वालातून भावी क्रांतीचे नेते ।
तेव्हा माझी तपश्चर्या व्यर्थ गेली नाही. १९४७ मध्ये देश स्वतंत्र झाला. क्रांतिसूर्य उगवला. कारण,
गर्जा जयजयकार क्रांतीचा, गर्जा जयजयकार ।
धन्यवाद, तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये
जरूर कळवा.
टिप्पण्या