मी मूळचा गुजरातमधील भूज गावचा रहिवासी. मी माझ्या घरी माझे आई-वडिल, आजी आजोबा, भाऊ व बहिणी-यांच्यासह राहत होतो. हो होतोच म्हणावे लागेल. कारण त्यांपैकी छोटी बहिण सोडली तर आता कोणीही हयात नाही. त्या सर्वांना धरणीमातेने गिळून टाकले आहे. काळाने पडद्याआड केले आहे. मी एक भूकंपग्रस्त बोलत आहे.
२६ जानेवारी २००० भारताचा प्रजासत्ताक दिन, भाऊ-बहिण कवायतीसाठी शाळेत गेले होते. सकाळी ८.३०-९.०० ची वेळ मी, आजी-आजोबा दूरदर्शनवर कवायतीचा कार्यक्रम पाहण्यात दंग होते. वडील स्नान करीत होते. आई स्वयंपाकघरात नाश्ता तयार करीत होती. मी नेहमीप्रमाणे भूक लागल्याचा शंख पुकारीत होतो. इतक्यात धडामधूम असा आवाज येऊ लागला. मला प्रथम चक्कर आल्याचा भास झाला. पण हळूहळू कपाट, खुर्च्या, दिवाण डगमगू लागले. स्वयंपाकघरातील भांडी खाली कोसळू लागली. आतबाहेर सगळीकडे किंचाळण्याचा आवाज येऊ लागला. जमीन जोराने हलू लागली. हा तर भूकंप होता. आम्ही सर्वजण जीवाच्या आकांताने एकमेकांचा जीव वाचविण्यासाठी धडपडू लागलो. माझ्या आजीआजोबांना वाचविण्यासाठी मी त्यांच्याकडे धाव घेतली. तोच माझ्या डोक्यावर वरून कोसळणाऱ्या दगडविटांचा एवढा मोठा आघात झाला की मी जागेवरच बेशुद्ध पडलो. शुद्ध आली तेव्हा मी दवाखान्यात भरती केला गेलो होतो. माझ्या डोक्याला पट्टी बांधली होती. माझ्याप्रमाणे प्रत्येकजण वेदनेने विव्हळत होता. कुणाचा हात, कुणाचे पाय, कुणाचे डोके प्लास्टरमध्ये गुंडाळलेले होते. सर्व डॉक्टर, परिचारिका आणि गुजरातमधील व इतर राज्यांतील लोक भूकंपग्रस्तांची मदत करण्यात गढून गेले होते. मी कसातरी उठत, धडपडत सर्वांची नजर चुकवून माझ्या इमारतीपाशी आलो. पूर्ण इमारत भुईसपाट झाली होती. मी ओक्साबोक्शी रडू लागलो. माझ्या घरच्यांचा व्याकुळ मनाने व आसुसलेल्या नजरेने शोध घेऊ लागलो. तेव्हा मी पाहिले, माझ्या वडिलांच्या अंगावर लोखंडी खांब पडला होता. आई, आजी, आजोबा रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. ते मन हेलावणारे दृश्य पाहून माझा बांध फुटला. सर्वजण दुःखाच्या महासागरात बुडून गेले होते.
मी कसेतरी स्वतःला सावरून माझ्या लहान भावंडाच्या शाळेपाशी गेलो. कितीतरी मुले ढिगान्याखाली अडकली होती. बरीच मृत पावली होती. त्या मृतांमध्ये माझा भाऊही होता. या भूकंपाने हजारोंची आयुष्ये उद्ध्वस्त केली, तर आपल्याबरोबर हजारोंची आयुष्ये घेऊन गेला. सुदैवाने ***ढिगान्याखाली** अडकलेल्या माझ्या लहान बहिणीला वाचवण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले. मी त्यांचा अतिशय ऋणी आहे.
मी जसा धरणीचा कोप पाहिला, तसेच लोकांच्या उदारतेचे दर्शनही बघितले. मुंबईतील, इतर राज्यातील लोकांनी पैशाची, अन्नाची, कपड्यांची, सहानुभूतीची सढळ हाताने मदत केली. एवढेच नव्हे तर आम्हां भूकंपग्रस्तांना आधार दिला. हळूहळू सर्व सावरले. देवाने आमचे सर्व हिरावून नेले. तसेच मदतीची दालनेही खुली केली. आता आम्ही दोघं भांवडे उद्याच्या आशेवर, आईबाबांची, भावाची, आजी-आजोबांची आठवण हृदयात ठेऊन उद्याची स्वप्नं पाहत जगत आहोत. रेडिओवर गाणे ऐकू येत होते.
उष:काल होता होता काळरात्र झाली.
अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली.
धन्यवाद, तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये
जरूर कळवा.
टिप्पण्या